ख्रिस्ताचे देहधारण
- suvartha31052021
- Jul 5
- 1 min read
Updated: Jul 5
“तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावांत तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे” (लूक २:११)
चार शुभवर्तमानांपैकी मत्तय व लूक या दोन शुभवर्तमानात आम्हांला प्रभू येशूच्या जन्माचा सविस्तर वृत्तांत वाचावयास मिळतो. नगरातील मेंढपाळांना जगाच्या तारणकर्त्याच्या जन्माची बातमी प्रथम देण्यात आली. प्रभू येशूच्या नम्र जीवनाचे हे एक उत्तम दर्शक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले हे बालक तीन दशकानंतर आपल्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे जगाचे तारण करणार होते. जग मात्र या अद्भूत घटनेपासून अनभिज्ञच होते व आजही आहे.
मलाखीनंतरचा चारशे वर्षाचा गडद आत्मिक अंधःकाराचा व स्तब्धतेचा कालखंड ख्रिस्ताच्या जन्माद्वारे मोडीत निघाला. “शब्दाला” देहस्वरुपात पाठवून देवाने त्याचे दीर्घकालीन मौन सोडले. अनेक दृष्टीने प्रभू येशूचा जन्म हा महत्वपूर्ण असलेला आम्हांस दिसतो. अभ्यासकांनी ख्रिस्ताच्या मरणावर अनेक सिद्धांताची मांडणी केलेली दिसते.
“ख्रिस्ताचा जन्म” हा देवाच्या तारणाच्या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. या योजनेच्या द्वारे देव पृथ्वीवरील सर्व मनुष्यांना सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो. प्रभू येशूच्या जन्माला धर्मशास्त्रीय भाषेत ख्रिस्ताचे “देहधारण” असे सुद्धा म्हणतात. ‘कुमारी जन्माच्या’ प्रक्रियेद्वारे देवाने ख्रिस्ताच्या देहधारणेचा महत्वाचा भाग यशस्वीरीत्या पूर्ण केला. संदेष्टयांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे नासरेथ गावात राहणाऱ्या कुमारी मरीयेच्याद्वारे ख्रिस्ताने या जगात मनुष्य म्हणून प्रवेश केला. याचाच अर्थ आदामाच्या पापमय स्वभावाचा कुठलाच अंश त्याच्या जीवनाला स्पर्शला नव्हता.
देहधारणेचा अर्थ
देहधारण म्हणजे आत्मारुपी देवाने मांसमय शरीर धारण करणे. योहानाने त्याच्या शुभवर्तमानात १ ल्या अध्यायात शब्दाच्या देहधारणाविषयी सांगितले (१:१४). पौराणिक दंतकथांमध्ये ज्याप्रमाणे देवता मानवी रूप धारण करत तसे हे ख्रिस्ताचे देहधारण नाही. देवाचा पुत्र प्रभू येशूने मानवी स्वभाव धारण केला. अशा प्रकारे प्रभू येशू या व्यक्तीत दैवी व मानवी स्वभावाचे संतुलन दिसून येते.
ख्रिस्ताचे मनुष्यत्व हे आमच्यापेक्षा भिन्न व परिपूर्ण असे होते. आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी असेच परिपूर्ण मनुष्यत्व हवे होते. इब्रीचा लेखक आम्हांला स्मरण देतो की, प्रभू येशू आमचा थोर याजक हा ‘सर्व प्रकारे पारखलेला’ होता (इब्री. ४:१५).
देहधारणेचा उद्देश
आम्हां मानवांचे तारण हाच एकमेव उद्देश प्रभूच्या देहधारणामागे होता. पवित्र शास्त्र सांगते – “रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही” (इब्री. ९:२२). नरकाच्या दंडातून सुटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे ‘देवाबरोबरील समेट’. यासाठी आमच्या पापांची खंडणी भरली जाणे आवश्यक होते. आम्ही पापी मनुष्य कोणाही मनुष्याची खंडणी भरू शकत नाही. आमच्या याच अपात्रतेला देवाने ख्रिस्ताच्या देहधारणाने उत्तर दिले. देवाने त्याच्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू या परिपूर्ण मनुष्याला जगाचा तारणारा म्हणून पाठविले (१योहान ४:१४). देव आत्मा आहे, तो मरू शकत नाही. म्हणून आमच्या ‘तारणासाठी’ प्रभू येशूला मनुष्य होणे आवश्यक होते. देहधारणाद्वारे त्याने आमचा दंड त्याच्या शरीराच्या व रक्ताच्या अर्पणाद्वारे पूर्ण भरला.
प्रियांनो, तुम्हीही अद्याप या देहधारण केलेल्या पुत्राच्या कार्यापासून अनभिज्ञ आहात काय? या तारणाऱ्या ख्रिस्ताचे आगमन तुमच्या जीवनात झाले आहे काय? प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारून तुम्ही आज नरकाच्या दंडातून आपली सुटका करून घेऊ शकता!
-बंधू सूरज इनामदार, वसई
Comentarios